दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा २४ जूनपासून   

राज्य शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. 
 
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने ५ मे रोजी बारावीचा, तर १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. या परीक्षांतील अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. आतापर्यंत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जात होती. मात्र, यंदा ही परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. सविस्तर वेळापत्रक https://www.mahahsscboard.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
 
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळांवरील, अन्य यंत्रणेने छपाई केलेले, अन्य माध्यमांतील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन 
 
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २४ जून ते ११ जुलै या कालावधीत बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने अनुक्रमे १५ जून, १६ जून रोजी घेतली जाईल. तर २४ जून ते ८ जुलै या कालावधीत दहावीचे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.

Related Articles